मोठी बातमी : जळगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रॅप, लाच प्रकरणी दोन कर्मचारी ताब्यात!

महा पोलीस न्यूज । दि.११ एप्रिल २०२५ । जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. कौटुंबिक छळाच्या प्रकरणात २० हजारांची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीत सहकार्य करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपीकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार लाच देण्यास इच्छूक नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
गुरुवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला असता मागणीअंती पोलीस कर्मचारी रविंद्र सोनार यांनी पोलीस कर्मचारी धनराज निकुंभ यांच्या सांगण्याप्रमाणे २० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोनार यांनी लाच स्वीकारताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.