रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकचे डीझेल चोरणारा जाळ्यात

रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकचे डीझेल चोरणारा जाळ्यात
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी गजाआड
जळगाव: शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी यावल तालुक्यातून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधील इंधन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनचालक आणि ट्रान्सपोर्ट मालक चिंतेत होते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले.
१६ मार्च रोजी फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी त्यांच्या मालकीचे दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. दोन्ही ट्रकच्या टाकीत १०० लिटर डीझेल भरलेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ पोहोचला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल गायब असल्याचे लक्षात आले. चोरीची खात्री झाल्यानंतर तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाले धागेदोरे
तपासादरम्यान, पोलिसांना समजले की, गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. परंतु किरकोळ नुकसान झाल्यामुळे वाहनचालकांनी अधिकृत तक्रारी दिल्या नव्हत्या. यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या संशयित व्यक्तीने ट्रकच्या टाकीचे झाकण उघडून नळीच्या सहाय्याने डीझेल काढल्याचे स्पष्ट दिसले.
यावल तालुक्यातून आरोपीला अटक
सीसीटीव्हीमधील संशयिताचा माग काढत पोलिसांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर (वय २५) याला अटक केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० लिटर डीझेल हस्तगत केले आहे.
या कारवाईमुळे परिसरातील वाहनचालक आणि ट्रान्सपोर्ट मालकांनी मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. वारंवार होणाऱ्या इंधन चोरीला आळा बसल्याने पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.