मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा यावल तालुक्याला दौरा

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा यावल तालुक्याला दौरा
घरकुल व आरोग्य सुविधांचा घेतला आढावा
जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांनी बुधवार, दि. ११ जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यात विविध विकासकामांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी डाभुर्णी गावात सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या कामांची पाहणी केली. मंजूर व सुरू असलेल्या बांधकामांचा आढावा घेत त्यांनी संबंधित यंत्रणेला कामे तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घरकुल लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे अभिप्राय जाणून घेतले.
यानंतर, सीईओ करनवाल यांनी यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील आरोग्य सेवा, सुविधा व कर्मचारी व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पुरविण्याच्या सूचना दिल्या.
करनवाल यांनी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. शेवटी त्यांनी यावल येथील पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली.
या दौऱ्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, पंचायत समिती यावलच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.