खळबळजनक : कुंटनखान्यातून पकडलेली बांगलादेशी तरुणी पळाली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटेलमधून छापेमारी करीत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांर्गत अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार दाखला गुन्ह्यात ताब्यात असलेली १९ वर्षीय पीडित तरुणी कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय आशादीप महिलांच्या वसतीगृहातील भिंतीवरून उडी घेवून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटना शनिवारी दि.२५ जानेवारी रोजी रात्री ९.५० वाजता घडली असून रविवारी पहाटे जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एका हॉटेलमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी छापा टाकून कारवाई केली होती. छापेमारीमध्ये एक बांगलादेशी तरुणी देखील मिळून आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यात पोलीसांनी १९ वर्षीय बांगलादेश येथील रहिवासी पिडीत मुलीला ताब्यात घेवून तिला जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय आशादीप महिलांचे वसतीगृहाच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, शनिवारी दि.२५ जानेवारी रोजी रात्री ९.५० वाजेच्या सुमारास पिडीत तरूणी वसतीगृहातील बाथरूमच्या बाजूच्या भिंतीवरून उडी घेवून पसार झाली. ही घटना उघडकीला आल्यानंतर शहर पोलीसांना माहिती देण्यात आली.
वसतीगृहाच्या परिविक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवार दि.२६ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहे.