वढोदा येथे आषाढी एकादशी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात महापूजा

वढोदा येथे आषाढी एकादशी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात महापूजा
चोपडा(प्रतिनिधी)- तालुक्यातील वढोदा येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी दि.२५ रोजी सकाळी ७ वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री पांडुरंगाची आरती व महापूजा जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.डॉ.मिहिका घुगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.यावेळी मंदिर परिसरात वारकरी संप्रदायाच्या जयघोषाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.उपस्थित भाविकांनी “ज्ञानोबा- तुकाराम” च्या गजरात विठुरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला.
महापूजेनंतर पं.स.चे माजी सभापती तथा चो.सा.का.चे माजी व्हा.चेअरमन गोकुळ पंढरीनाथ पाटील यांच्याहस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे व सौ.डॉ.मिहिका घुगे यांचा वारकरी परंपरेनुसार फेटा, उपरणे परिधान करून तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे कौतुक करत आषाढी एकादशीचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भाविकांनी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमास राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,चोपडा पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, नेमिचंद जैन, आशिषभाई गुजराथी,नंदकिशोर पाटील,ॲड. घनश्याम पाटील,ॲड.डी.पी.पाटील,गिरीश भगवंतराव पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, वारकरी, युवक-युवती आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






