Social

वाघूरचे आरक्षित पाणी इतरत्र देण्यास तीव्र विरोध

वाघूरचे आरक्षित पाणी इतरत्र देण्यास तीव्र विरोध

महासभेतील प्रस्तावाविरोधात विविध संस्था-संघटनांचे आयुक्त व महापौरांना निवेदन; ठराव मंजूर झाल्यास आंदोलनासह न्यायालयात जाण्याचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरासाठी वाघूर धरणातून आरक्षित असलेल्या पाण्यातून शासकीय रुग्णालय आणि क्रीडा संकुलाला पाणी देण्याच्या किंवा विकण्याच्या प्रस्तावाला विविध संस्था-संघटना आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या महासभेत यासंदर्भातील ठराव मांडला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि महापौरांना निवेदन देण्यात आले आहे. हा ठराव मंजूर झाल्यास आंदोलन छेडण्यासह संबंधित निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त परिस्थितीला वारंवार सामोरा जात असून, शहरातील पाणीपुरवठ्याची स्थितीही चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना सुप्रीम कॉलनीसारख्या काही बाहेरील भागांत पाच ते सहा दिवसांआड पाणी मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर उपलब्ध धरणसाठ्यावरच पुढील काळात अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

२४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन अद्याप अपूर्ण

अमृत योजनेअंतर्गत जळगाव शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत शहरासाठी आरक्षित असलेल्या वाघूर धरणातील पाण्याचा अन्य कारणांसाठी वापर करण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताला बाधक ठरू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.

उन्हाळ्यात वाढणारे तापमान, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजन शहरातील नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच पाणपोईसारख्या उपक्रमांद्वारे उन्हाळ्यात दिलासा देण्याची गरजही निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे.

ठराव मंजूर झाल्यास आंदोलनाचा इशारा

शहरासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून शासकीय रुग्णालय आणि क्रीडा संकुलाला पाणी देण्याच्या प्रस्तावाला निवेदनकर्त्यांनी अन्यायकारक आणि अविचारी ठरवत विरोध केला आहे. महासभेत हा ठराव मंजूर झाल्यास आंदोलन करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या निर्णयाविरोधात आयुक्त, महापौर, उपमहापौर, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर लोकशक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक पराग घनश्याम कोचुरे, गौतमी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, मा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमित तुलसी, लोकशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धारा कृष्णकांत ठाकर, पवन पंढरी महाजन, फर्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष नामदेव पाटील, हिंदू-मुस्लीम एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष युसुफ खान, विचारदीप फाऊंडेशनचे संस्थापक विवेक सैनदाणे, Aain फाऊंडेशनचे अध्यक्ष रईस कुरेशी, Circle Muslim Youthचे अध्यक्ष मातीन पटेल, अरहान फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, तीर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ येवले आणि साथ फाऊंडेशनचे सचिव समीर मेनन यांच्या नावे नमूद आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button