राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा
संघाच्या नव्या आयामानुसार पातोंडा तालुक्यातील उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पातोंडा तालुका (ता. अमळनेर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेनुसार पातोंडा परिसराला “तालुका आयाम” म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच विजयादशमी उत्सव रविवारी, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सायं. ४ वाजता पातोंडा ग्रामपंचायत चौकातून झालेल्या भव्य पथसंचलनाने झाली. स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात, दंडसह आणि घोषांच्या निनादात शिस्तबद्ध संचलन केले. संचलनात बाल, तरुण आणि ज्येष्ठ स्वयंसेवकांचा उत्साही सहभाग होता. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करून स्वागत केले.
यानंतर सायं. ५ वाजता विजयादशमी उत्सवाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संजय सोनवणे सर, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्या मंदिर, रुंधाटी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. श्रीकांतजी पाठक, प्रांत सहसंयोजक, शिव शंभु मंच यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी मार्गदर्शनात श्री. पाठक यांनी संघाच्या वाढत्या कार्यविस्तारावर प्रकाश टाकत, “संघ हा केवळ संघटना नसून एक संस्कार संस्था आहे जी राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने समाजशक्ती जागृत करते,” असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे श्री. सोनवणे सर यांनी युवकांना चारित्र्य, शिस्त आणि समाजहिताचे संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संकल्प संजय वैद्य यांनी केले.
या प्रसंगी पातोंडा तालुक्यातील सर्व शाखांतील स्वयंसेवक, ग्रामस्थ, महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषांच्या निनादात, भगव्या ध्वजाच्या साक्षीने आणि राष्ट्रभावनेच्या तेजाने संपूर्ण पातोंडा तालुका भारावून गेला होता.






