हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने “हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ” या नव्या उपकंपनीची स्थापना ५ जून २०२५ रोजी करण्यात आली आहे.
महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे मित्तल चेंबर्स, नरीमन पॉईंट येथे कार्यरत असून, जिल्हा व प्रादेशिक स्तरावरचे कामकाज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविले जात आहे. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच एनएसएफडीसी योजना राबविल्या जातात.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यासाठी मुख्यालय मुंबई येथून खालीलप्रमाणे उद्दिष्टे प्राप्त झाली आहेत यात अनुदान योजना : ६, बीजभांडवल योजना : ६ ,थेट कर्ज योजना : ३ व एनएसएफडीसी योजना : १० याप्रमाणे आहेत.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील हिंदू खाटीक समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हातनूर कॉलनी, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.) जळगाव यांनी केले आहे.






