अमृतमार्फत भुसावळ येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण

अमृतमार्फत भुसावळ येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण
जळगाव : अमृत मार्फत भुसावळ येथे २ ते १३ जुलै दरम्यान २० प्रशिक्षणार्थींसाठी ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ बॅचचे आयोजन करण्यात आले असून गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक युवकांमध्ये उद्योजकतेबाबत जागरुकता निर्माण करुन स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेली जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधीनी’च्या(अमृत) माध्यमातून जिल्ह्यातील भुसावळ येथे ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे २० प्रशिक्षणार्थींसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून गरजू युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या प्रशिक्षण सत्राला प्रशिक्षक म्हणून भुषण आग्रे (ज.जि.स.बँक लि.शाखा भुसावळ ), के. सी. ई. सोसायटी इंजिनियरीग कॉलेजचे प्रा.नितीन मटकरी, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दीपक गुप्ता, प्रद्योत कुलकर्णी यांचेही विशेष मागदर्शन व सहकार्य लाभणार आहेत.
प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, डिजिटल व्यवहार, उद्योग व्यवस्थापन, ग्राहक व्यवस्थापन तसेच अमृतपेठ, अमृत पेठ ऑफलाइन, वैयक्तिक व्याज परतावा योजना, ड्रोन पायलट मिशन व विविध कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांमध्ये उद्योजकतेबाबत जागरुकता निर्माण होऊन स्वयंरोजगाराला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.






