Detection Story : आठ दिवसांचा वॉच, चकवा देत पळणाऱ्या MD माफियाच्या मुसक्या आवळल्या

महा पोलीस न्यूज | २१ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ड्रग्स माफियांच्या हालचालींवर लक्ष वेधले असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. भुसावळ शहरात ७२ लाखांचे ड्रग्स पकडल्यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने देखील जळगावातील शाहू नगरातून १० लाखांचे ड्रग्स पकडले आहे. आठ दिवस विक्रेत्यावर वॉच ठेवल्यानंतर पथकाने रात्री १२.३० वाजता छापा टाकला. पोलिसांना पाहतच पळ काढणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करीत पकडले. अधिक माहिती घेतली असता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर आणि तपास पथकातील कर्मचारी उपस्थित होते..
पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना
लोकसभा आदर्श आचारसंहिताच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी याबाबत वेळोवेळी सुचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जळगांव शहरात शहरात कॉलेज तरुण तसेच बेरोजगार तरुण हे व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याच्या तक्रारी पोलीस अधिक्षक यांना प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या अंनुषंगाने कारवाई करण्याबाबत त्यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी यांना सुचना दिल्या होत्या.
मध्यरात्री सापळा रचून केली कारवाई
जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी शाहूनगर या परीसरात ड्रग्स विक्रीचे रॅकेट असल्याच्या संशयावरून विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना सुचविले होते. जळगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुधीर सावळे यांना गुप्त बातमी दारामार्फत इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा.शाहु नगरपत्री हा ड्रग्स विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर यांनी ८ दिवस त्याठिकाणी वॉच ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी शाहुनगर पडक्या शाळेच्या आवारात एम.डी. ड्रग्स हा अंमली पदार्थ रात्री १२.३० वा. विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचला.
१० लाखांचे एमडी, दोघे अटकेत
शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री सापळा रचून इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा.शाहुनगर पत्री मज्जीद जवळ याला शाहुनगर पडक्या शाळेच्या आवारातुन ताब्यात घेवून त्याच्याकडून १२२ वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ दोन मोबाईल फोन असा ९ लाख ८५ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. इम्रान याने दिलेल्या माहितीवरुन ड्रग्स पुरवठा करणारा गोकुळ उर्फ रघु विश्वनाथ उमप वय-४० रा. कंजरवाडा याला देखील लागलीच अटक करण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, सुधीर सावळे, हवालदार भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकुर, सुनिल बडगुजर, किरण ठाकरे यांनी केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :