Other

जामनेरजवळ काळाचा भीषण घाला! तीन महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सहा जण ठार

मालदाभाडी फाट्यावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; शेतमजूर कुटुंबावर काळाचा घाला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जामनेर तालुक्यातील जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाडी फाट्याजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात अवघ्या तीन महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी, तीन महिन्यांचे बाळ आणि अन्य एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या शेतमजूर कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समोरासमोर धडक; सहाही जणांचा दुर्दैवी अंत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मालची तांडा येथील रहिवासी असलेले भिलाले कुटुंबीय दुचाकीने प्रवास करत होते. मालदाभाडी फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात त्यांच्या पल्सर दुचाकीची (क्रमांक एमपी ६८ झेडएफ ३३४०) जामनेरकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (क्रमांक एचआर ५५ एके ५२३२) समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन महिन्यांच्या बाळाचाही जीव गेल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले. एका क्षणात हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह तीन महिन्यांचे बाळ
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे रामा सुरशिंग भिलाले (वय २६ वर्षे), शिमला रामा भिलाले (वय २२ वर्षे), पुज्या रामा भिलाले (वय ५ वर्षे), भरती रामा भिलाले (वय ३ वर्षे), श्रवण रामा भिलाले (वय ३ महिने), चंपालाल रेवणशिंग भिलाले (वय २८ वर्षे) अशी आहेत सर्व मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मालची तांडा येथील रहिवासी असून, ते शेतमजुरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जामनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातस्थळाजवळील एचपी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले असून, त्याच्या आधारे अपघाताची परिस्थिती तपासली जाणार आहे.

अपघातातील ट्रक आणि ट्रकचालकाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एका भीषण धडकेत कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रोजच्या उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी करणाऱ्या या कुटुंबातील सहाही जणांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः तीन महिन्यांच्या बाळासह दोन लहान बालकांचा झालेला मृत्यू मन सुन्न करणारा आहे. या भीषण दुर्घटनेमुळे जामनेर-बोदवड मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास जामनेर पोलिसांकडून सुरू आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button