Crime

दुचाकी चोरट्याला अटक, दोन मोटरसायकली जप्त

 दुचाकी चोरट्याला अटक, दोन मोटरसायकली जप्त

अमळनेर पोलिसांची कामगिरी

अमळनेर: अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल लांबवणाऱ्या एका अट्टल चोराला अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. संशयिताकडून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अमळनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीराम कॉलनी, शिरूड नाका अमळनेर येथील रहिवासी हरेश गंभीर चौधरी यांची २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स मोटरसायकल (क्रमांक MH-19-AQ-2162) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी हरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून ७ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, वेळोदे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील रहिवासी विनायक उखा पाटील हा चोरीच्या मोटरसायकली विक्री करत आहे.

मिळालेल्या बातमीच्या आधारे जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, पोलीस अंमलदार नरेश बडगुजर, नितीन मनोरे आणि उज्ज्वल पाटील यांच्या पथकाने वेळोदे येथून संशयित आरोपी विनायक उखा पाटील यास तातडीने ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात आणून खाक्या दाखवत विचारपूस केली असता, संशयिताने मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून फिर्यादी हरेश चौधरी यांची २५ हजार रुपयांची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटरसायकल तसेच आणखी एक अतिरिक्त चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अमळनेर पोलिसांनी मोटरसायकल चोरास अटक करून गुन्हा उघडकीस आणला असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button