अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी चाळीसगाव न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपी ‘सुपड्या’ याला २० वर्षांची सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी चाळीसगाव न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपी ‘सुपड्या’ याला २० वर्षांची सक्तमजुरी
चाळीसगाव: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या खटल्यात मुख्य आरोपी विठ्ठल पाटील उर्फ ‘सुपड्या’ याला दोषी ठरवत न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि एकूण ३० हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंडाच्या रक्कमेतील २५ हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, आरोपी विठ्ठल पाटील उर्फ सुपड्या याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३६६(अ) अन्वये दोषी ठरवून ५ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने कारावास भोगण्याचा आदेश दिला आहे. तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ५(m) आणि ६ अंतर्गत गंभीर दोषी धरत त्याला २० वर्षे कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास आणखी ४ महिने अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेतून २५ हजार रुपयांची मदत थेट पीडित मुलीस देण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण खटल्यादरम्यान पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी न्यायालयीन कामकाजात आणि सबळ पुरावे सादर करण्यात मोलाचे सहकार्य केले.







