एसपींचा एक फोन आणि रावेर पोलीस अलर्ट : ट्रकचालकाला जिवंत जाळणारा संशयीत जाळ्यात
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना घेतले ताब्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत ट्रकचालकाचा गळा आवळून खून करून त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून मोठे यश मिळविले आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये एका ट्रक चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान हा अपघात नसून ट्रकचालकाचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि त्यानंतर मृत्यूचे खरे कारण लपविण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रकला आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता.
आज (शुक्रवारी) सकाळी सुमारे ८.४८ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची शक्यता असल्याची माहिती दिली. तसेच तो पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, रावेर पोलिसांकडे आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध होता. तरीही रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत संशयिताचा माग काढला आणि त्याला रावेर परिसरातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने आर्थिक कारणातून ट्रकचालकाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेहासह ट्रकला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८) असे असून तो महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर (पंजाब) येथील रहिवासी आहे.
आरोपीकडून पांढऱ्या रंगाचा आयशर ट्रक (क्रमांक PB-02-EW-4299) जप्त करण्यात आला असून तो सध्या रावेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. आरोपीचा ताबा घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले आहे. या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यापूर्वीच जेरबंद करण्यात रावेर पोलिसांना यश आले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





