पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णायक भूमिकेमुळे विमानतळ मार्ग होणार झगमगाट; ५.०५ कोटींच्या कामास जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मंजुरी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णायक भूमिकेमुळे विमानतळ मार्ग होणार झगमगाट; ५.०५ कोटींच्या कामास जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मंजुरी
*जळगाव प्रतिनिधी — जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत घेण्यात आला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून अजिंठा चौफुल्ली ते चिंचोली विमानतळ परिसरापर्यंतच्या रस्त्यावर अत्याधुनिक विद्युत प्रकाशयोजना उभारण्यासाठी सुमारे ५ कोटी ५ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाणारा हा महत्त्वाचा प्रवेशमार्ग आता रात्रीच्या वेळीही सुरक्षित, प्रकाशमय आणि आकर्षक होणार आहे.*
जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अजिंठा चौफुल्ली ते विमानतळ परिसरादरम्यान रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे प्रवासी, वाहनचालक आणि पादचारी यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर कायमस्वरूपी प्रकाशयोजना उभारण्याची मागणी आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर दि. ७ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि जिल्ह्याच्या वाढत्या विकासाला प्राधान्य देत संबंधित विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या कामासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विषय समितीसमोर मांडला होता. त्यांच्या मागणीला बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला. तसेच जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खा. स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली.
समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दि. १५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ५ कोटी ५ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी विकासकामाच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे विमानतळाकडे जाणारा प्रमुख मार्ग अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक होणार असून, जळगाव शहराच्या प्रवेशद्वाराची ओळख अधिक आकर्षक बनेल. वाढत्या हवाई संपर्काला पूरक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या समन्वयात्मक नेतृत्वातून आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने महत्त्वाचे निर्णय वेगाने मार्गी लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





