Other

अमळनेरमध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा! पैलाड भागातील मुख्य रस्त्यावरील तुटलेली लोखंडी जाळी बनली ‘मृत्यूचा सापळा’; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

अमळनेरमध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा! पैलाड भागातील मुख्य रस्त्यावरील तुटलेली लोखंडी जाळी बनली ‘मृत्यूचा सापळा’; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

अमळनेर ( प्रतिनिधी):
येथील पैलाड भागातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये संत सखाराम महाराज संस्थानकडून पारोळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मोठ्या नाल्यावर बसवण्यात आलेली लोखंडी जाळी पूर्णपणे तुटली असून, या ठिकाणी सध्या ‘मृत्यूचा सापळा’ निर्माण झाला आहे. महिन्याभरापूर्वीच बसवलेली ही जाळी निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे महिनाभरातच तुटून गतप्राण झाली आहे. या ठिकाणी कधीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा मार्ग मुख्य आणि रहदारीचा रस्ता असल्यामुळे येथून अहोरात्र वाहनांची ये-जा सुरू असते. गटारीवरील ही कटर (खड्डा) अत्यंत मोठी आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे वाहनचालकांना ही तुटलेली जाळी दिसत नाही, ज्यामुळे येथे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. “एखाद्याचा जीव गेल्यावरच नगर परिषद प्रशासनाला जाग येईल का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित नगरसेवकांकडे धाव घेऊन तक्रारी केल्या. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही घटकांकडून या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोणीही लोकभावना समजून घ्यायला किंवा ही जाळी दुरुस्त करायला तयार नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
“आम्ही प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की, कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही लोखंडी जाळी तातडीने दुरुस्त करण्यात यावी. जर नगर परिषदेने लवकरात लवकर यावर उपाययोजना केली नाही, तर आम्ही सर्व नागरिक मोठ्या संख्येने नगर परिषदेवर तीव्र मोर्चा काढू. तसेच, येथे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याला संपूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.”
असा इशारा गोलू धनगर, सागर पाटील, सुजित पाटील, शरद भोई, गुड्डू शिरसाठ, राज भिल, सुभाष भिल, विशाल बिऱ्हाडे यांनी दिला आहे.

अवघ्या एका महिन्यापूर्वी बसवलेली जाळी एवढ्या लवकर तुटतेच कशी? असा सवाल करत ही जाळी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. या निकृष्ट कामामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार आणि निष्काळजी प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

आता अमळनेर नगर परिषद प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून अपघात होण्यापूर्वीच ही जाळी तातडीने दुरुस्त करणार की नागरिकांच्या जिवाशी असाच खेळ सुरू राहणार, याकडे संपूर्ण पैलाड भागाचे लक्ष लागले आहे.

आम्ही आमच्या प्रभागात लोखंडी जाळी बसवली होती परंतु पुढील पुलाजवळ काम सुरू असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने अवजड वाहनांची वाहतुकी केल्यामुळे ती जाळी तुटलेली आहे त्यांच्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे, तसे आम्ही नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे लवकरच त्या ठिकाणी जाळी सह स्पीड ब्रेकर बसवून हा प्रश्न मार्गी लावू.
सौं. पुष्पा पंकज भोई ( नगरसेविका प्रभाग क्र. 12 )

आमच्या भागातील रस्त्यावरील लोखंडी जाडी अवजड वाहनांमुळे तुटलेली आहे. ती दुरुस्तीसाठी आम्ही नगरपरिषदाकडे पाठपुरावा केला आहे, लवकरच नवीन लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.
सुयोग ज्ञानेश्वर धनगर (नगरसेवक प्रभाग क्र. 12)

…..

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button