Other

महापौरांच्या रुद्रावतारानंतर “त्या” व्यक्तीने स्वतःहून काढले पत्र्याच्या शेडचे मोठे अतिक्रमण !

महापौरांच्या रुद्रावतारानंतर “त्या” व्यक्तीने स्वतःहून काढले पत्र्याच्या शेडचे मोठे अतिक्रमण !

दीपमाला काळे यांची शहरात पुन्हा धडाकेबाज कारवाई

जळगाव :महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सुरू असलेल्या मोहिमेचा प्रत्यय नुकताच आला असून, कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या आणि बेकायदेशीर अतिक्रमणाच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळाला आहे. महापौर दीपमाला काळे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि धडाकेबाज भूमिकेमुळे येथील मोकळी जागा व मुख्य हमरस्ता पुन्हा एकदा स्वच्छ आणि मोकळा झाला आहे.

*नेमकी घटना काय?*
गुरुवारी (दि. १५) महापौर दीपमाला काळे या महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत वार्ड क्रमांक एक मधील परिसराची पाहणी करत होत्या. या दरम्यान कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर भागातील साईबाबा मंदिराच्या जवळील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या व्यक्तीने तिथे पत्र्याचे शेड उभारून मोठ्या प्रमाणावर भंगार सामान व साहित्य जमा केले होते. विशेष म्हणजे, याच शेडच्या बाजूला परिसरातील नागरिकही कचरा टाकत असल्याने या मुख्य हमरस्त्यावरील मोकळ्या जागेवर प्रचंड अस्वच्छता पसरली होती.

*महापौरांचा दणका; अतिक्रमण स्वतःहून हटवले*
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महापौरांनी पाहणीदरम्यानच संबंधित अतिक्रमणधारकाला गुरुवारी कडक शब्दांत तंबी दिली. “आजच्या आज तुझे सर्व साहित्य व पत्र्याचे शेड काढून घे, अन्यथा उद्या महापालिकेकडून जेसीबीच्या साहाय्याने हे संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. महापौरांच्या या धडक कारवाईच्या इशाऱ्याचा तात्काळ प्रभाव दिसून आला. दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी संबंधित व्यक्तीने स्वतःहून पुढाकार घेत पत्र्याच्या शेडमधील सर्व भंगार साहित्य हलवले आणि जागा पूर्णपणे रिकामी करून दिली.

*आरोग्य विभागाकडून तत्काळ सफाई*
अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही तातडीने सूत्रे हलवली. जागेवर ताफा आणि वाहने पाठवून संपूर्ण परिसर चोखपणे साफ करण्यात आला, ज्यामुळे वर्षानुवर्षे अस्वच्छतेचा प्रश्न बनलेली ती जागा आता पूर्णपणे स्वच्छ झाली आहे.

परिसरातून महापौरांचे कौतुक
या मोकळ्या जागेवर तातडीने निर्णय घेऊन महापालिकेची जमीन अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी महापौर दीपमाला काळे यांचे विशेष आभार मानले आहेत. महापौरांच्या या कणखर आणि धडाकेबाज निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, स्वच्छता मोहिमेबाबतची त्यांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button