Other

अत्यावश्यक संच वाटपात लाच घेताना महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

अत्यावश्यक संच वाटपात लाच घेताना महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

केवायसीसाठी १०० रुपयांची मागणी; कारवाईत २६ हजारांहून अधिक रक्कम जप्त

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप योजनेत लाभार्थ्याकडून १०० रुपयांची लाच स्वीकारताना भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मूळ तक्रारदार यांनी शासनाच्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ जून रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार त्यांना ४ जून रोजी वावडदा येथे संच ताब्यात घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र प्राप्त झाले होते. संच वाटप केंद्रावर गेल्यानंतर भाग्यश्री पाटील यांनी केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील असे सांगून १०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाभार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष भाग्यश्री पाटील यांनी तक्रारदाराकडून १०० रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून १३ हजार ६७० रुपये रोख रक्कम तसेच झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यात ठेवलेले १३ हजार १०० रुपये असे एकूण २६ हजार ७७० रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली स्वीकारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत. या कारवाईस पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच एसीबीच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button