Other

टोलनाक्यावर भीषण अपघात : केमिकल टँकरची कंटेनरला धडक, चालकाचा मृत्यू

पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत, केमिकल सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । धुळेकडून पारोळ्याकडे येत असलेल्या गुजरात क्रमांकाच्या जीजे-१८-बीव्ही-८३१५ या केमिकल टँकरने सबगव्हाण टोलनाक्याजवळ समोर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार मागून धडक दिल्याने शनिवारी भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की टँकरचा टायर फुटून कॅबीनला आग लागली. या अपघातात टँकर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने टँकरमधील केमिकल सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (Toluene Diisocyanate – TDI) हे रसायन होते. हे अत्यंत क्रियाशील (Highly Reactive) ॲरोमॅटिक डायआइसोसायनेट असून लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्स तयार करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक खबरदारी घेत परिसर सुरक्षित केला.

अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून धुळे–पारोळा महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुजरातमधून ओडिशाकडे निघालेला हा टँकर अपघातग्रस्त झाल्याने काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

दरम्यान, क्रेन घटनास्थळी पोहोचल्यानंतर अपघातग्रस्त टँकर आणि कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांच्या तत्पर नियोजनामुळे दीर्घकाळ वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता टळली.

या संपूर्ण घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे बारकाईने लक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button