
अमळनेरमध्ये उपविभागीय अभियंता ४ हजाराची लाच स्वीकारतांना जाळ्यात
अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (१५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील हे धरणगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचेही प्रभारी होते. संबंधित योजनेशी निगडित मंजुरीसाठी त्यांनी एका व्यक्तीकडून ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीने ही बाब नंदुरबार लाचलुचपत विभागाला कळविल्यानंतर जळगाव विभागाच्या सहकार्याने सापळा रचण्यात आला.
सायंकाळी कार्यालयातच दिलीप पाटील यांनी फिर्यादीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत नंदुरबार लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेडकॉन्स्टेबल हेमंत महाले तसेच जळगाव विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
या धडक कारवाईनंतर अमळनेर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नंदुरबार लाचलुचपत विभाग करीत आहे.






