Crime

चाळीसगावात कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये  महिलेच्या घरात सापडले शस्त्रास्त्रांचे कोठार; १९ तलवारी, ११ चॉपरसह गुप्ती जप्त!

४४ गुन्हेगार जाळ्यात, 'ऑडी'सह ३९ लाखांच्या कार जप्त; चाळीसगावात प्रचंड खळबळ

चाळीसगावात कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये  महिलेच्या घरात सापडले शस्त्रास्त्रांचे कोठार; १९ तलवारी, ११ चॉपरसह गुप्ती जप्त!

​४४ गुन्हेगार जाळ्यात, ‘ऑडी’सह ३९ लाखांच्या कार जप्त; चाळीसगावात प्रचंड खळबळ

​चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तींचे कंबरडे मोडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार, २४ जून रोजी पहाटे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी प्रचंड फौजफाट्यासह अचानक धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. पहाटे २ ते ४ वाजेच्या दरम्यान चाललेल्या या थरारक मोहिमेत पोलिसांनी ४४ संशयितांना ताब्यात घेतले असून, ३९ लाख रुपयांच्या ३ आलिशान कार जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान नवनाथ नगर भागात एका महिलेच्या घरातून तब्बल १९ तलवारी आणि ११ चॉपर, चाकू व गुप्ती असा धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गुप्त माहिती अन् पोलिसांची धडक कारवाई:
कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नवनाथ नगर परिसरातील आरती किरण देठे (वय ३७ वर्षे) हिच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी घरात प्रवेश करून कसून झडती घेतली असता, तिथे लपवून ठेवलेला घातक शस्त्रांचा मोठा साठा पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.

या घरझडतीत पोलिसांनी तब्बल १९ धारदार तलवारी तसेच ११ चॉपर, चाकू व गुप्ती जप्त केली. एका महिलेच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा कोणत्या उद्देशाने आणि कोणासाठी ठेवण्यात आला होता? याद्वारे शहरात काही मोठा गुन्हा घडवण्याचा कट होता का? या सर्व बाजूंनी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

पहाटेच्या अंधारात ८० गुन्हेगारांची झाडाझडती:

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये चाळीसगाव शहरात एकाच वेळी विविध भागात पोलिसांनी वेढा घातला होता. या मोहिमेत पोलिसांनी रेकॉर्डवरील तब्बल ८० सराईत आरोपी आणि गुन्हेगारांची प्रत्यक्ष पडताळणी करत त्यांच्या घरांची झडती घेतली. यापैकी ४४ जणांना पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणले.

आर्म ॲक्ट आणि ३९ लाखांच्या कार जप्त:
या ऑपरेशनदरम्यान बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म ॲक्ट कलम ४/२५ अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अंतर्गत संशयास्पद आढळलेल्या ३ आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये ‘ऑडी’ (MH 14 EP 7358), ‘वरना’ (MH 43 AR 3409) आणि ‘वॅगनआर’ (MH 20 EJ 4890) या गाड्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३९ लाख रुपये आहे.

फरार आरोपींना बेड्या अन् दारूबंदीचा दणका:

कारवाईच्या सत्रामध्ये पोलिसांनी अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ८ अजामीनपात्र पकड वॉरंटची यशस्वी बजावणी केली, तसेच ३ व्यक्तींना समन्स बजावण्यात आले. दारूबंदी कायद्यांतर्गत ३ प्रकरणांमध्ये कारवाई करून बेकायदेशीर दारूचे कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले.

मोठ्या पोलीस फौजेचा सहभाग:
ही विशेष मोहीम जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस अमलदार, स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पथके आणि ३ आरसीपी (RCP) पथकांचा मोठा ताफा सहभागी झाला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button