यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या; गिरीश महाजन यांचे निर्देश
१९ गावांतील ९,१२८ हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ; सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार अमोल जावळे यांचा पाठपुरावा

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या; गिरीश महाजन यांचे निर्देश
१९ गावांतील ९,१२८ हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ; सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार अमोल जावळे यांचा पाठपुरावा
जळगाव, प्रतिनिधी : यावल तालुक्यातील १९ गावांमधील ९ हजार १२८ हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या यावल उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. शेळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी पाणीसाठा, पाणीवापराचे नियोजन आणि प्रस्तावित सिंचन योजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अमोल जावळे यांनी योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली.
शेळगाव प्रकल्पाची पाहणी
शेळगाव मध्यम प्रकल्पाची एकूण पाणीसाठवण क्षमता ४.११ टीएमसी असून, प्रकल्पांतर्गत ४.५१ टीएमसी पाणीवापराचे नियोजन करण्यात आले आहे. यावल उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल जावळे यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली. त्याची दखल घेत मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांना प्रस्तावावर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले.
९,१२८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
यावल उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर तालुक्यातील १९ गावांमधील ९ हजार १२८ हेक्टर, म्हणजेच सुमारे २२ हजार ५५५ एकर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसात खंड पडल्यास खरीप पिकांना आवश्यक वेळी पाणी देता येईल. तसेच रब्बी हंगामातील लागवड वाढविण्यासह उपलब्ध पाण्यानुसार भाजीपाला, फळबागा आणि अन्य पिकांचे नियोजन करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते. सिंचनासाठी विहिरी आणि कूपनलिकांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. पिकांना वेळेवर पाणी मिळाल्यास उत्पादनातील चढ-उतार कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
जळगाव-यावल प्रवासाचे अंतर २० किलोमीटरने कमी होणार
शेळगाव गावाजवळ प्रकल्पाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचीही मंत्री महाजन यांनी पाहणी केली. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जळगाव ते यावल प्रवासाचे अंतर सुमारे २० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
शेतकऱ्यांना शेतमाल जळगावच्या बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होईल. विशेषतः भाजीपाला आणि फळांसारखा नाशवंत शेतमाल कमी वेळेत बाजारात नेता येणार आहे. पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिले.
तीन उपसा सिंचन योजनांच्या पुनरुज्जीवनाचा आढावा
रावेर विधानसभा मतदारसंघातील हतनूर कालव्यावरील आमोदा, बामणोद आणि भालोद या तीन उपसा सिंचन योजनांच्या पुनरुज्जीवनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे ३ हजार २०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या कामांसाठी सुमारे २१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.
नदीघाट आणि पायऱ्यांच्या कामालाही निर्देश
शेळगाव प्रकल्पाच्या खालील बाजूस नदीपात्रालगत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी नदीघाट व पायऱ्या बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि आमदार अमोल जावळे यांनी केली. नदीकाठावर उतरण्यासाठी ग्रामस्थांना सोयीची जागा उपलब्ध व्हावी, हा या मागणीमागील उद्देश आहे. या कामासाठी आवश्यक कार्यवाही करून ते तातडीने हाती घेण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
अधिकारी उपस्थित
या पाहणी दौऱ्यावेळी माजी माहिती आयुक्त तथा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले, उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. वराडे, शेळगाव प्रकल्प उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत सोनवणे, नशिराबाद येथील शेळगाव उपविभागाच्या उपविभागीय अभियंता मंगल रेघे आणि सहाय्यक अभियंता श्रेणी-१ कामेश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे, सुरेश धनके आणि जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक अरविंद देशमुख यांचीही उपस्थिती होती.







