
आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू : गुलाबराव पाटील
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह पाड्यांवरील पाणीपुरवठ्याला प्राधान्य; धरणगावात ख्वाजाजी नाईक स्मारक परिसरात दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम
जळगाव, प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान मोलाचे असून, भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या त्यागाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करतानाच शिक्षण, रोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त धरणगाव येथील क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक स्मारक परिसरात आयोजित स्वच्छता अभियान, दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तर आकर्षक विद्युत रोषणाईने दीपोत्सवाला विशेष शोभा आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी १६ कोटींचा निधी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. शिक्षणातूनच समाजाची खरी प्रगती साध्य होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवर अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, तेथे नळ पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल. तसेच दुष्काळी पाड्यांमध्ये बोअरवेलचे सौरऊर्जीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१९ मध्ये सहकार राज्यमंत्री असताना या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर २० जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. आदिवासी समाजाच्या शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या या स्मारकाच्या उभारणी व विकासात योगदान देता आल्याचे समाधान असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. महापुरुषांच्या स्मारकांचे जतन करण्यासोबतच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणातूनच आदिवासी समाजाची प्रगती : खासदार स्मिताताई वाघ
भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. या महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून विविध क्षेत्रांत प्रगती साधावी. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती करणे, हीच या क्रांतिकारकांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले.
जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, लोककला, पारंपरिक संस्कृती आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी. जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा केवळ उत्सव न राहता आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प ठरावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
पथनाट्यातून क्रांतिकारकांच्या संघर्षाला उजाळा
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी जनजातीय गौरव सेवा सप्ताहातील विविध उपक्रम आणि सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील प्रा. योगेश माळी, वैशाली कोळी आणि गणेश अहिरे यांनी भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. या सादरीकरणातून क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी. सी. (आबा) पाटील, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सविताताई सोनवणे, नगराध्यक्ष लीलाताई चौधरी, संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अमोल जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे व पवन पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







