धक्कादायक : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या २४ तासांत बेड्या; जळगाव एलसीबीची कारवाई

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ उडाली असतानाच, चोपडा शहर परिसरात झालेल्या एका भीषण खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून झालेल्या या हत्येतील आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत फिल्मी स्टाईलने धावत्या ट्रेनमधून ताब्यात घेतले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपासून ते २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान चोपडा ते धरणगाव रोडवर ही घटना घडली. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३ वर्ष, रा. तारामती नगर, चोपडा) यांची अज्ञात शस्त्राने चेहरा आणि डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा धावता थरार
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे समजले. तात्काळ जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईकडे रवाना झाले. आरोपी मुंबईहून पुन्हा रेल्वेने जळगावच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून धावत्या ट्रेनमध्ये चढून तपासणी सुरू केली. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये पोलिसांनी दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींची नावे आणि कबुली
ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींमध्ये विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा व निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांचा समावेश आहे. सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मृत प्रदीप महाजन याने आरोपी विजय वैदकर याला दिलेल्या जुन्या त्रासामुळे आणि पूर्व वैमनस्यातून हा खून केल्याचे त्यांनी कबूल केले.
तपास पथकात यांचा होता सहभाग
पोलीस अधीक्षक (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) आणि चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोउनि. सोपान गोरे, पोउनि. जितेंद्र वल्टे, पोहेकों रविंद्र पाटील, पोहेकॉ दिपक माळी, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकों विष्णु बिहाडे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोकों रावसाहेब पाटील, चापोहेकॉ रिजवान शेख तसेच चोपडा शहर पो.स्टे. चे पो.निरी. पवन देसेले, पोउनि. चेतन परदेशी यांनी आरोपीतांची गोपनिय माहिती काढून त्यांना शिताफिने ताब्यात घेवून त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात ताब्यात घेतले आहे.






