लाचेचा सौदा महागात; जळगावात पोलिसाला १ लाखांची लाच घेताना अटक!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगावमध्ये लाचखोरीविरोधात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शनिपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी पोलिस नाईक विनोद अहिरे हे शनिपेठ पोलिस स्टेशन, जळगाव येथे कार्यरत आहेत. जळगावमधील एका तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार अर्ज करण्यात आला होता. संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता प्रकरण निकाली काढण्यासाठी अहिरे याने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मांडल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासात लाच मागणीची खात्री झाल्यानंतर दि.१३ एप्रिल रोजी पथकाकडून कारवाई करण्यात आली. शनिपेठ पोलिस स्टेशन परिसरातच आरोपीने तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पो.उप.निरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस कर्मचारी संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या पुढील तपास करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास त्वरित एसीबीशी संपर्क साधावा. नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन अशा भ्रष्टाचाराविरोधात सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.





