Other
गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, ६६.११ टक्के जलसाठा शिल्लक

पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी दिलासादायक स्थिती
जळगाव : पाचोरा, चाळीसगाव आणि मालेगाव तालुक्यांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात ६६.११ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.
५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणात एकूण १५,२३०.२० द.श.ल.घ. (दशलक्ष घनफूट) जलसाठा जमा झाला आहे. यापैकी १२,२३०.२० द.श.ल.घ. पाणीसाठा ‘जिवंत’ (वापरण्यायोग्य) असून, उर्वरित ३ हजार द.श.ल.घ. साठा राखीव आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणातील जलपातळी संथगतीने वाढत आहे.
पाणीसाठ्यातील ही वाढ शेतकरी आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आहे. गिरणा धरणात पुरेसा साठा असल्याने आगामी काही आठवड्यांतील पाणी नियोजन आणि शेतीच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होण्याची शक्यता आहे.






