प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विठ्ठल नामाचा महागजर; आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विठ्ठल नामाचा महागजर; आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात
वारकरी वेशभूषा, भजन-अभंग, टाळ-मृदुंग आणि पारंपरिक खेळांनी रंगला भक्तिमय सोहळा
चोपडा | प्रतिनिधी : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलभक्तीने भारावून गेला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी यांच्या वेशभूषेत सहभागी होत भजन, अभंग, गायन, टाळ-मृदुंग, रिंगण, फुगडी, कलानृत्य तसेच विविध पारंपरिक खेळांचे आकर्षक सादरीकरण केले. “माऊली… माऊली…” आणि “जय जय रामकृष्ण हरी” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी., उपमुख्याध्यापिका सौ. निखिला एम. तसेच संस्थेचे समन्वयक श्री. गोविंदभाई गुजराथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पालखी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या दिंडी सोहळ्याचे नियोजन चेतना बडगुजर आणि क्रीडाशिक्षक समाधान माळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दीपक सर आणि विशाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारोपप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि शिक्षकांच्या नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित हा दिंडी सोहळा विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेबद्दलची जाणीव दृढ करणारा ठरला.






