चाळीसगावच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
अपहरण करून अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध; अन्य दोन आरोपींनाही सहा महिन्यांची शिक्षा

चाळीसगावच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
अपहरण करून अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध; अन्य दोन आरोपींनाही सहा महिन्यांची शिक्षा
चाळीसगाव I महा पोलीस न्यूज: शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला घरात डांबून ठेवत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अक्षय संजय भगत याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच विष्णू बाळू मोरे आणि मंडाबाई बाळू मोरे या अन्य दोन आरोपींना अपहरणाच्या गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीडिता घरून शाळेत जात असताना अक्षय भगत, विष्णू मोरे आणि मंडाबाई मोरे यांनी तिला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर अक्षय भगत याने तिला पुणे येथील पांगारकर वस्तीतील आपल्या घरी २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत डांबून ठेवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी पीडितेच्या आजोबांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. पुढील तपासात पीडिता पुणे येथे अक्षय भगत याच्याकडे आढळून आल्यानंतर तिच्या जबाबावरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी धरमसिंग विठ्ठल सुंदरडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिता आणि फिर्यादीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचा पुरावा आणि विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता राजेंद्र बोरसे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्य आरोपी अक्षय संजय भगत याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५(एल) व ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३६६ अ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि कलम ३४२ अन्वये सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विष्णू बाळू मोरे आणि मंडाबाई बाळू मोरे यांना भादंवि कलम ३६३ अन्वये प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सहकार्य केले.







