HealthSocial

दातांतील अन्नकण काढण्याचा नाद जीवावर बेतता-बेतता वाचला; १८ वर्षीय तरुणीच्या अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान, नाक व घसा विभागाची यशस्वी कामगिरी; गुंतागुंतीचा धोका पत्करून पिन काढली बाहेर

दातांतील अन्नकण काढण्याचा नाद जीवावर बेतता-बेतता वाचला; १८ वर्षीय तरुणीच्या अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान, नाक व घसा विभागाची यशस्वी कामगिरी; गुंतागुंतीचा धोका पत्करून पिन काढली बाहेर

जळगाव, प्रतिनिधी : दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या चांगलेच अंगलट आले. दात साफ करत असताना ही पिन अचानक गिळली जाऊन थेट अन्ननलिकेत जाऊन अडकली. मात्र, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने आणि तत्परतेने उपचार करत ही सेफ्टी पिन सुरक्षितरीत्या बाहेर काढून तरुणीचा जीव वाचवला.

टोकदार पिनमुळे मोठी गुंतागुंत होण्याचा धोका तरुणीच्या अन्ननलिकेत अडकलेली पिन टोकदार असल्याने ती बाहेर काढताना अन्ननलिकेला छिद्र पडणे, अंतर्गत रक्तस्राव होणे किंवा पिन श्वसनमार्गात सरकणे असा मोठा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांसाठी ही प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक व कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली.

या वैद्यकीय पथकाने केले यशस्वी उपचार महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय सरोदे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललित राणे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. विनोद पवार, डॉ. दीपिका ओक, डॉ. अनिकेत दौंड आणि कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. किरण गोरे, डॉ. यश सिसोदे व डॉ. साक्षी पोखरणा यांनी उपचार प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.

तसेच, भूलशास्त्र विभागातील डॉ. ऋतुराज काकड, डॉ. चेतनकुमार अद्राट, डॉ. नेहा पाटील व डॉ. समीर तडवी यांचे विशेष सहकार्य लाभले. मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका रूपाली पाटील आणि अश्विनी सोनवणे यांनीही या प्रक्रियेत मदत केली.

टोकदार वस्तू न वापरण्याचे आवाहन दात स्वच्छ करण्यासाठी सेफ्टी पिन, सुई किंवा इतर कोणत्याही टोकदार वस्तूंचा वापर करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा वस्तू चुकून गिळल्या गेल्यास कोणतेही घरगुती उपाय करत न बसता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय सरोदे यांनी नागरिकांना केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button