
जळगावात उत्तर महाराष्ट्रातील पहिला ‘बुक स्ट्रीट’; एक लाख पुस्तकांचा ज्ञानसोहळा
१५ नोव्हेंबरला भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर आयोजन; प्रत्येक वाचकाला एक पुस्तक मोफत
जळगाव, प्रतिनिधी : जळगावच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मानाचा नवा अध्याय जोडला जाणार आहे. व. वा. जिल्हा वाचनालयाच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेत काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर हा उपक्रम होणार आहे.
या उपक्रमात विविध भाषा आणि विषयांतील सुमारे एक लाख पुस्तकांची रस्त्यावर आकर्षक मांडणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाला भेट देणाऱ्या प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीचे एक पुस्तक विनामूल्य मिळणार आहे. डोंबिवली, पुणे आणि ठाणे येथे यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आता जळगावकरांनाही पुस्तकांच्या अनोख्या विश्वाची अनुभूती घेता येणार आहे.
डिजिटल युगात वाचनसंस्कृतीला नवी चालना
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तकांपासून दूर जात असलेल्या युवा पिढीला पुन्हा वाचनाकडे वळविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. पुस्तकांच्या सहवासातून वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक रस्ते हे केवळ वाहतुकीचे माध्यम नसून ज्ञान, विचार आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचे केंद्रही बनू शकतात, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
जळगाव शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, तरुण आणि सर्व वयोगटांतील नागरिकांना एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने पुस्तकांचा खजिना अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
आयोजनासाठी विविध विभागांचे सहकार्य
या उपक्रमासाठी जळगाव शहर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि शहर वाहतूक विभागाचे सहकार्य लाभत आहे. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीचे अमेय घेसास, हेमंतकुमार नेहेते, संकेत पै आणि सिद्धार्थ सामंत परिश्रम घेत आहेत.
व. वा. जिल्हा वाचनालयाच्या वतीने कार्याध्यक्ष सी. ए. अनिलकुमार शाह, चिटणीस प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, संचालक मंडळ, पदाधिकारी आणि ग्रंथपाल अनिल अत्रे यांच्यासह कर्मचारी वर्ग आयोजनासाठी प्रयत्नशील आहे.
या ज्ञानसोहळ्यात सहभागी होऊन वाचनसंस्कृतीच्या प्रसाराला हातभार लावण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व. वा. जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी. ए. अनिलकुमार शाह यांनी केले आहे.







