Other

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

जळगाव: हतनूर धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या आवकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे जलद्वार उघडून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे अधिकृत आवाहन जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हतनूर धरणाच्या एकूण ४१ दरवाजांपैकी ४ गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत, तर ३२ दरवाजे दोन मीटरने वर उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत धरणातून तापी नदीच्या पात्रात १ लाख ८५ हजार ८२८ क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात आवक अशीच सुरू राहिल्यास पुढील काही तासांत हा विसर्ग ३ लाख ५० हजार ते ३ लाख ७५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्याची प्रबळ शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढणार असल्याने नदीकाठच्या सर्व गावांना, सखल भागातील रहिवाशांना तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, जनावरे सोडणे किंवा कपडे-भांडी धुण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. अचानक निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button