PoliticsSocial

पावसाळ्यापूर्वी ‘बाबा खोली’ नाल्याची विशेष स्वच्छता मोहीम

महापौर दीपमाला काळे यांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाची कारवाई; तीन ट्रॅक्टर गाळ उपसला

पावसाळ्यापूर्वी ‘बाबा खोली’ नाल्याची विशेष स्वच्छता मोहीम


महापौर दीपमाला काळे यांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाची कारवाई; तीन ट्रॅक्टर गाळ उपसला

जळगाव (प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आल्याने शहरातील नालेसफाईच्या कामांना वेग आला असून प्रभाग क्रमांक १५ मधील ‘बाबा खोली’ परिसरातील मोठ्या नाल्याची रविवारी आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर गाळ व कचरा बाहेर काढण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रभागातील ‘बाबा खोली’ नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती असल्याने साफसफाईसाठी आवश्यक जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यात नाला तुंबून घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे तक्रारी मांडल्या होत्या. नागरिकांच्या समस्येची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला तातडीने नाल्याची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या.

महापौरांच्या आदेशानुसार रविवारी सकाळी ७ वाजेपासून आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली. जागेची कमतरता आणि बिकट परिस्थिती असूनही तब्बल सहा तास सलग काम सुरू ठेवण्यात आले. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबीच्या नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्यात आला.

या मोहिमेदरम्यान सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी कंपनीचे ठेकेदार व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः ‘बाबा खोली’ परिसरात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी काही दिवसांनी पुन्हा नाल्याची साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button