Other

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव (प्रतिनिधी) | अनेकांना घडविणारा, अनेकांच्या भावविश्वाला आकार देणारा आणि अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारा माणूस आपल्या सर्वांना सोडून देवाघरी निघून गेला आहे. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार, लावलेली सवय, दिलेला विचार आणि सांगितलेला प्रत्येक शब्द आठवून त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे नुकतेच एका भावपूर्ण श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी येथील व. वा. वाचनालयाच्या ज्या रामनारायण सभागृहात एकाच दिवशी एकाच बालनाट्याचे दहा प्रयोग करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता, त्याच सभागृहात या शोकसभेचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेसाठी पुणे येथून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सहचरिणी अंजली धारु, त्यांची कन्या शर्वरी धारु व संपदा जोशी या विशेषत्वे उपस्थित होत्या. शोकसभेच्या शेवटी अंजली धारु यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर गायकवाड आणि जळगाव शहराचे असलेले अतूट ऋणानुबंध भावूकपणे उपस्थितांसमोर मांडले.

शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा योगेश शुक्ल, ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश शर्मा, चिंतामण पाटील, सौ. प्रतिमा धर्माधिकारी याज्ञिक, राजेंद्र देशमुख, शंभू पाटील, पवन खंबायत, हर्षल पाटील, नाशिक येथील रंगकर्मी संदीप पाचंगे या सर्व रंगकर्मींनी आपल्या मनोगतातून गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शोकसभेचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. या सभेला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शहरातील कलावंत, नाट्य रसिक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मोठा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या रंगकर्मीला निरोप दिला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button