
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे रविवार, दि. ३ मे रोजी पत्रकारांसाठी “नवीन फौजदारी कायदे” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यशाळेत भारतीय न्याय प्रणालीतील अलीकडील बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत उपस्थित होते.
कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदे — भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) — याबाबत पोलीस निरीक्षक आर.टी. धारबळे यांनी सखोल माहिती दिली. त्यांनी या नव्या कायद्यांमधील महत्त्वाचे बदल, गुन्हे नोंदणी प्रक्रिया, तपास पद्धतीतील सुधारणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील बदल यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले.
कार्यक्रमादरम्यान सादरीकरणासाठी PPT फाईलचा वापर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित पत्रकारांना विषय अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत झाली. तसेच, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि इतर कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
या कार्यशाळेमुळे पत्रकारांना नवीन कायद्यांविषयी अद्ययावत माहिती मिळाली असून, गुन्हेगारी बातम्या अधिक अचूक व माहितीपूर्ण पद्धतीने सादर करण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





