

जळगावच्या पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त भार नको; स्टेडियमसाठी स्वतंत्र जलव्यवस्था करा
शहराच्या भविष्यातील पाणीगरजेचा विचार करून आमदार राजूमामा भोळेंची शासनाकडे मागणी
जळगाव, दि. ७ ऑक्टोबर २०२६ : जळगाव शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ आणि भविष्यातील वाढती पाणीगरज लक्षात घेता शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्ध साठ्यावर कोणताही अतिरिक्त भार पडू नये, यासाठी शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या स्टेडियम किंवा क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र जलस्रोत अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त यांना स्वतंत्र पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शहराच्या पाण्यावर अतिरिक्त भार नको
जळगाव शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असून वाढीव भागांमध्येही पाणीपुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतून नागरिकांची गरज पूर्ण करताना अनेक आव्हाने आहेत. त्यात भविष्यात शहराची हद्दवाढ झाल्यास नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांची पाणीगरजही वाढणार आहे. त्यामुळे आजच्या गरजेबरोबरच पुढील अनेक वर्षांच्या पाणीगरजेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार भोळे यांनी म्हटले आहे.
नवीन स्टेडियम किंवा मोठ्या क्रीडा संकुलासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता राहणार आहे. मात्र, त्यासाठी शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडल्यास भविष्यात त्याचा परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेडियमसाठी स्वतंत्र जलस्रोत, स्वतंत्र पाणी आरक्षण अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारण्याचा पर्याय शासन व संबंधित विभागांनी तपासावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पर्यायी जलस्रोतांचा तांत्रिक अभ्यास करा
स्टेडियम प्रकल्पासाठी उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून व्यवहार्य पर्याय निश्चित करावा. तसेच प्रकल्पाची पाणीगरज स्वतंत्रपणे भागविण्यासाठी आवश्यक नियोजन आणि पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणीही आमदार भोळे यांनी केली आहे.
“जळगाव शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा हक्क आणि भविष्यातील पाणीगरज कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये. नवीन विकासकामांना विरोध नाही; मात्र त्यासाठी शहराच्या विद्यमान पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये. त्यामुळे संबंधित प्रकल्पासाठी स्वतंत्र जलव्यवस्था करणे हा अधिक दूरदृष्टीचा आणि दीर्घकालीन उपाय ठरेल,” असे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.
२५, ५० आणि १०० वर्षांचा विचार करून जलनियोजन आवश्यक
जळगाव शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ, नवीन निवासी भाग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, उद्योग तसेच इतर नागरी सुविधांची भविष्यातील पाणीगरज लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार भोळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठ्याचे संरक्षण करतानाच भविष्यातील पाणीगरज लक्षात घेऊन आवश्यक जलस्रोत आणि पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
— आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) कार्यालय, जळगाव







