पसंतीक्रमानुसार जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या जाहीर
३४२ प्रशासकीय तर ४० विनंती बदल्या; पोलीस मुख्यालयाची ‘क्रेझ’ कायम

पसंतीक्रमानुसार जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या जाहीर
३४२ प्रशासकीय तर ४० विनंती बदल्या; पोलीस मुख्यालयाची ‘क्रेझ’ कायम
जळगाव : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व विभागांमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे आदेश अखेर गुरुवारी सायंकाळी जारी करण्यात आले. नेमणुकीच्या ठिकाणी पाच वर्षांचा विहित सेवा कालावधी पूर्ण झालेल्या ३४२ अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून ४० अंमलदारांच्या विनंती बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हे आदेश काढले.
पसंतीक्रमानुसार मिळाल्या नियुक्त्या
बदलीपात्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांपासून ते शिपाई पदावरील अंमलदारांकडून काही महिन्यांपूर्वी तीन पसंतीक्रम मागविण्यात आले होते. संबंधित अंमलदारांनी इच्छित ठिकाणांची नावे नमूद केली होती. यंदा पोलीस प्रशासनाने याच पसंतीक्रमानुसार नियुक्त्या दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी बदली मिळाली आहे. त्यामुळे पोलीस दलात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला अंमलदारांचाही समावेश
बदली आदेशामध्ये २९२ पुरुष अंमलदारांसह ४० महिला अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्या ४० कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस मुख्यालयाकडेच ओढा
गुन्हे तपासाचा ताण, अंतर्गत कामकाजातील दबाव आणि सततची धावपळ टाळण्यासाठी अनेक अंमलदार पोलीस मुख्यालयात नियुक्ती मिळविण्यास प्राधान्य देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी मुख्यालयात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, यंदाही अनेक तपासी अंमलदारांनी पोलीस मुख्यालयालाच पसंती देत बदली मिळविल्याने मुख्यालयाची ‘क्रेझ’ अद्याप कायम असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
अशा झाल्या बदल्या
- सहाय्यक फौजदार / सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक : ४३
- पोलीस हेड कॉन्स्टेबल : १०१
- पोलीस नाईक : २५
- पोलीस शिपाई : १२४
- विनंती बदल्या : ४०





