Crime

कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने दिवसा चोरी; दोघे निष्पन्न, ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने दिवसा चोरी; दोघे निष्पन्न, ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात, फरार साथीदाराचा शोध सुरू

धुळे : कपाटाचे लॉक दुरुस्त करून देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न केले आहे. या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ४९ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचा साथीदार पातालसिंग शिकलीकर हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

महिलेच्या उपस्थितीत चोरी

९ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथे ही घटना घडली. दत्तु लोटन पाटील यांच्या पत्नी घरात असताना गावात कुलूपाच्या चाव्या बनविणारे अनोळखी इसम त्यांच्या घरी आले. कपाटाचे लॉक दुरुस्त करून देण्याचा बहाणा करून त्यांनी कपाटातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीने तपासाला वेग

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना १३ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली. गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली परिसरात चावी बनविण्याचे साहित्य घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोउनि. अमित माळी यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

बॅगमध्ये सापडले चोरीचे दागिने

पोलिसांनी नंदुरबार चौफुली येथून संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये चावी बनविण्याची साधने आढळून आली. संशय बळावल्यानंतर बॅगची तपासणी केली असता त्यात सोने-चांदीचे दागिने मिळून आले.

चौकशीत हे दागिने त्याचा काका पातालसिंग शिकलीकर (रा. एकतानगर, नालवे रोड, नंदुरबार) याने अंजनविहिरे येथून दिवसा चोरी केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉगलचे जोड, २.५ ग्रॅम सोन्याचे गळ्यातील पेंडल, ३ ग्रॅम सोन्याची अंगठी, चांदीची चाळ, चांदीचे कडे, चांदीच्या साखळ्या आणि चांदीचा मुकुट यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४९ हजार रुपये आहे. यासोबत चोरीसाठी वापरले जाणारे चावी बनविण्याचे साहित्यही मिळाले.

फरार आरोपीचा शोध सुरू

या कारवाईमुळे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. फरार आरोपी पातालसिंग शिकलीकर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शिरपूर शहर आणि नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि. अमित माळी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, अमोल पाटील व अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button