CrimeSocial

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद : अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे आवाहन

 औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद : अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे आवाहन

देशव्यापी बंदचा परिणाम जिल्ह्यातही जाणवण्याची शक्यता : काही सेवा मात्र सुरू राहणार

जळगाव : आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आवाहनानुसार प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

दरम्यान, आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी औषध प्रशासन व पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार (मो. ९४२२३५६१४३) व श्रीमती क. र. पाटील (मो. ९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button