जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने खून
बेलसवाडीत धक्कादायक घटना; १७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात

जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने खून
बेलसवाडीत धक्कादायक घटना; १७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात
मुक्ताईनगर | प्रतिनिधी तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणातील संशयित १७ वर्षीय अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुजर रफीक शेख (वय १९, रा. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर) हा शुक्रवारी रात्री सुमारे ८.४५ वाजता गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर उपस्थित होता. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून त्याचा एका अल्पवयीन मुलासोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर संशयिताने अबुजरच्या छातीवर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने अबुजरचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मयत तरुण आणि संशयित यांच्यात यापूर्वी मस्करी करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच जुन्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा वादाला तोंड फुटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण, घटनाक्रम आणि त्यामागील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.
या घटनेप्रकरणी रफीक शेख नुरा (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ३१९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा, हत्याराचा शोध व जप्ती तसेच अन्य कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
प्रकरणातील संशयित १७ वर्षांचा अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेतील लागू तरतुदींनुसार करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.







