ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात पुन्हा खून, कंडारीला एकाला भोसकले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका थांबत नसून दोन दिवसापूर्वी जळगाव शहरात एकाचा खून झाल्यानंतर आज पुन्हा भुसावळ कंडारी येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मयत तरुण आणि मारेकरी दोघे जळगावचे असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात नाना पाटील या तरुणाचा खून करण्यात आला होता. आज पुन्हा भुसावळ शहरातील कंडारी भागात एका तरुणाचा रात्री १० वाजता खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव शहरातील दोन तरुण भुसावळ येथे गेले असता त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
कंडारी भागातील महादेव मंदिर परिसरातील एका बियरबार जवळ ही घटना घडली असून मयत तरुणाचे नाव जितेंद्र कोळी वय-३५ रा.जळगाव असे समजते. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धाव घेतली असून मारेकरी जळगाव शहरातील एका राजकारणी व्यक्तीचा मुलगा असल्याचे समोर येत आहे.






