CrimeDetection

बोअरवेल केबल चोरी करणारे दोघे जेरबंद; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्ह्यांची उकल

बोअरवेल केबल चोरी करणारे दोघे जेरबंद; १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्ह्यांची उकल

शिंदखेडा, प्रतिनिधी : शेतांमधील बोअरवेलच्या केबल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिंदखेडा पोलिसांनी अटक करत १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे केबल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान दलावाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील एका शेतातून बोअरवेलच्या केबल कापून नेत असताना मयूर भिला धनगर (वय २४, रा. वाल्मिक नगर, शिरपूर) आणि राहुल संजय पारधी (वय २०, रा. शिरपूर, जि. धुळे) हे फिर्यादीच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदखेडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी या गुन्ह्याची सखोल चौकशी केली. यावेळी शिंदखेडा परिसरात मागील वर्षभरात घडलेल्या विजेच्या तार आणि बोअरवेल केबल चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

पोलिसांनी दोन्ही संशयितांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी यापूर्वीही शिंदखेडा परिसरातील दोन शेतांमधून वीजतारा व बोअरवेल केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी आणि चोरी केलेला एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे क्रमांक १३९/२०२६, १४९/२०२६ आणि १५०/२०२६ अशा एकूण तीन केबल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाब ठाकरे तसेच पोलीस अंमलदार हेमंत फुलपगारे, गणेश सोनवणे, अकोल पठाण, प्रशांत पवार, रुपेश चौधरी, पुनमचंद कोळी आदींच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button