Other

टाकळी प्र. चा. येथे पाणीटंचाई व खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रीय जनमंच पक्षाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

टाकळी प्र. चा. येथे पाणीटंचाई व खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रीय जनमंच पक्षाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

चाळीसगाव, प्रतिनिधी : टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीअंतर्गत विविध प्रभागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाई व खराब रस्त्यांच्या समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी, चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांमध्ये नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

उन्हाळा आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज वाढली असताना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत असून त्यांचा आर्थिक भार वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे रस्त्यांची स्थिती आणखी बिकट झाली असून नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनमंच पक्षाने प्रशासनाकडे सर्व प्रभागांमध्ये नियमित आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू करणे, पाणीपुरवठा योजनेची तांत्रिक तपासणी करून अडचणी दूर करणे, खराब झालेल्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, पावसाळ्यापूर्वी विशेष रस्ते दुरुस्ती अभियान राबविणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्ष आणि ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेलीस, महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव शहराध्यक्ष प्रमोद डोंगरे, चाळीसगाव तालुका बांधकाम कामगार आघाडी प्रमुख अमोल पाटील, चाळीसगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष अधिकार पाटोळे, साहेबराव सपकाळे, आबा सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button