
अमळनेर | पंकज शेटे : जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पाडळसरे धरण प्रकल्प (निम्न तापी प्रकल्प) आता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत (PMKSY) समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ८५९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री, अर्थमंत्री आणि संबंधित विभागांशी संपर्क साधून या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले.
पाडळसरे प्रकल्पातून तापी नदीच्या पाण्याचा प्रभावी वापर करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून, शेती उत्पादनात वाढ, पीक पद्धतीत बदल आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही यातून मोठी चालना मिळेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल खासदार वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि राज्यातील नेत्यांचे आभार मानले.






