अतिवृष्टीग्रस्त उंदिरखेडची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अतिवृष्टीग्रस्त उंदिरखेडची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
वसंतनगरातील भिंत कोसळून मृत्यू झालेल्या वृद्धाच्या कुटुंबीयांचे सांत्वन; मदतकार्याचा घेतला आढावा
पारोळा | प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांनी आज पारोळा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त उंदिरखेड गावाला भेट देऊन पूर व मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संबंधित यंत्रणांकडून मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार, तहसीलदार पारोळा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
वसंतनगरात मृताच्या कुटुंबीयांची भेट
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वसंतनगर (ता. पारोळा) येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून मृत्यू झालेल्या वृद्धाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाकडून नियमानुसार सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.
घटनास्थळी पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.







