Crime

जळगावात वाळू माफियांची मुजोरी : तलाठ्याला ट्रॅक्टरवरून फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची अरेरावी (Jalgaon Sand Mafia) दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही वाळू उपसा करणाऱ्यांची मुजोरी कायम असून, आता थेट सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रॅक्टरवरून फेकून देत त्याला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर हल्ला
बुधगाव येथील नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे पथक मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी काही ट्रॅक्टर वाळू उपसा करताना आढळले. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पळून गेली, मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला.

ट्रॅक्टरवरून खाली फेकून मारण्याचा प्रयत्न
हाती लागलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणला जात असताना, ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी जडे यांना चालक आणि मालकाने खाली खेचले. एवढेच नाही तर त्यांनी तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तलाठी जडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करणार
चोपडा तालुक्यात बुधगाव परिसरात वाळू उपशाला कोणतीही परवानगी नाही, असे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. वाळू माफियांकडून यापूर्वीही नायब तहसीलदारांवर हल्ला झाला होता. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई केली जाईल, असे थोरात यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यातून होणारे हल्ले हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button