CrimeSocial

स्मार्ट वीज मीटर हटविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

महावितरणविरोधात वाघळी ग्रामस्थांचा जनआक्रोश; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट वीज मीटर हटविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

महावितरणविरोधात वाघळी ग्रामस्थांचा जनआक्रोश; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे बसविण्यात आलेले स्मार्ट वीज मीटर तातडीने हटवून पूर्वीप्रमाणे पोस्टपेड वीज मीटर बसविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन केले. वाघळी येथील सोसायटीसमोरील महामार्गावर काही काळ वाहतूक रोखून ग्रामस्थांनी महावितरणच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसंदर्भात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. आंदोलनस्थळी महावितरणचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

वाढीव वीजबिलांचा मुद्दा ऐरणीवर

स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून स्मार्ट मीटर तातडीने हटवून पूर्वीचे पोस्टपेड मीटर बसवावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.

पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित

महामार्गावर काही वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलक आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली. रस्त्याच्या कडेला बसून अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच संबंधित निवेदन स्वीकारून वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

तीव्र आंदोलनाचा इशारा

ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात वाघळी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी, सरपंच, उपसरपंच सोनू धनगर, नाना अहिरे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जंगले, निंबा महाजन, सुरेंद्र चौधरी, विकास चौधरी, दिलावर शेख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाईदास नाना खैरे, सोसायटी सदस्य सुभाष खैरे, कैलास पाटील, दादाभाऊ महाजन, अण्णा चौधरी, विजय खैरे, वाल्मीक जाने, राज बोरसे, वना वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button