शेतात अनधिकृत प्रवेश करून मारहाण; चार आरोपींना सहा महिने कारावास आणि दंड

शेतात अनधिकृत प्रवेश करून मारहाण; चार आरोपींना सहा महिने कारावास आणि दंड
भडगाव, : शेतात अनधिकृत प्रवेश करून मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपींना सहा महिने साध्या कारावासाची आणि प्रत्येकी ३,५०० रुपये दंडाची शिक्षा भडगाव न्यायालयाने सुनावली आहे.
न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही.एस. मोरे यांनी विक्रम शंकर पाटील व इतर तिघे (सर्व रा. गोंडगाव, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम ३२३, ४४७, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने ही शिक्षा सुनावली.
ही घटना १४ जून २०२१ रोजी लोन पिराचे (ता. भडगाव) शिवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी शेतात काम करीत असताना आरोपींनी शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून शेतात अनधिकृतरित्या प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ आणि अन्य शारीरिक भागांवर लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केली.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्हा रजिस्टर नंबर १४२/२०२१ अन्वये पोलिसांनी तपास केला. सुनावणी दरम्यान चार साक्षीदार तपासण्यात आले.
अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील आर.ए. रंगरेज यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक कंडारे हे केसचे पैरवी अधिकारी होते, तर पोलीस नाईक मनोज माळी यांनी केस वॉच म्हणून सहाय्य केले.