इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे अखेर पुण्यात सापडले; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा

इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे अखेर पुण्यात सापडले; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा
पुणे (प्रतिनिधी) – गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले इंदापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर शोध लागला असून, त्यांना पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून सुरक्षित अवस्थेत शोधण्यात आले आहे. त्यांच्या बेपत्तापणामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
केमदारणे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस हवालदार रासकर आणि कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे समोर आले होते. या आरोपामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (१४ जून) सकाळी विष्णू केमदारणे यांनी आपल्या पत्नीशी दूरध्वनीवर संपर्क साधला. या माहितीच्या आधारे त्यांच्या पत्नीने तत्काळ इंदापूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्परतेने लोकेशन ट्रेस करून त्यांना आळंदी परिसरातून शोधून काढले.
सध्या केमदारणे यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासात त्यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे.