कर्नाटक एक्सप्रेसमधून उतरताना महिलेच्या पिशवीतून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

कर्नाटक एक्सप्रेसमधून उतरताना महिलेच्या पिशवीतून अडीच लाखांचा ऐवज लांबविला
जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना
जळगाव l महा पोलीस न्यूज l १६ मे २०२५ l रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिला प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (१५ मे) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला मनमाड येथे अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
खंडवा येथील लक्ष्मी विशाल अग्रवाल (वय ४०) या आपल्या मुलगी अवनी व मुलगा समर्थसह खंडव्यातून कर्नाटका एक्सप्रेसने जळगावकडे येत होत्या. बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीला सोन्याचे टॉप घेऊन देण्यासाठी त्यांनी आपल्या बॅगेत ६० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे २५ ग्रॅम वजनाच्या, २ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या.
जळगाव स्थानकावर येण्यापूर्वी दोन अनोळखी व्यक्तींनी “आमच्याकडे सामान अधिक आहे, तुम्ही आधी उतरा” असे सांगत लक्ष्मी यांना गोंधळात टाकले. गाडी थांबताच त्या मुले व बॅगसह उतरल्या. मात्र, काही वेळातच त्यांना संशय आल्याने त्यांनी बॅग तपासली असता रोकड आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
यासंदर्भात त्यांनी तातडीने लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच मनमाड येथे एका संशयित चोरट्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.