Politics

जळगाव मनपा : दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी होणार उपमहापौर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे महायुतीची सत्ता स्थापन होणार असून, भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी तर शिवसेनेचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवड होणार आहे.

उमेदवारीचा पेच आणि अंतिम निर्णय
महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर भाजपमध्ये उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील आणि दीपमाला काळे यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. अखेर, राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व संभ्रम दूर करत दीपमाला काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

असा आहे राजकीय योगायोग
प्रभाग ७ मधून बिनविरोध विजयी झालेल्या भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौर पदासाठी तर प्रभाग ८ मधून बिनविरोध विजयी झालेले शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौर पदासाठी निवड करण्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर होणारे दोन्ही उमेदवार आधी नगरसेवक म्हणूनही बिनविरोध निवडून आले आहेत, हा जळगावच्या राजकारणातील एक दुर्मिळ योगायोग ठरला आहे.

शहराच्या विकासाला नवी गती मिळेल
नावांची अधिकृत घोषणा करण्यासाठी जळगावमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेले असल्याने, आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही प्रक्रिया केवळ औपचारिकता उरली आहे. या निवडीमुळे जळगाव शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button